Friday, October 12, 2012

| २६ जाने ८४ |

आश्वासनांचा
पहिला वाढदिवस...
रिते मेघ आश्वासनांचे
क्षितीजपार केव्हाच-
केलंयस आमंत्रित त्यांना?



| ९ एप्रिल ८४ |

झावळ्या लावलेलं आयुष्य
ओहोटता किनारा अजमावीत
कातरवेळी;
अशावेळीः
एखादाच समुद्रपक्षी
ठिपका होत
क्षितीज-भेदीत.



| १० एप्रिल ८४ |

नवख्या पंखांची भिरभिर...
समूहात अखंड;
रक्तभीषण.
...समुहास नकार आपसूक;
योग्यतेचं मूल्यजोखण न होता.



| १२ एप्रिल ८४ |

हे कसे क्षण आहेत?
बर्फगारतेतही वितळू पाहताहेत.
अशी कशी ही आच?
की
अचानक यावा अंटार्क्टिकावर माध्यान्ही सूर्य!



| १२ एप्रिल ८४ |

: टाळू पाहिलेलीच वेळ माझ्यासमोर
मिळालेल्या दृष्टिक्षेपात मला अधाशीपणे पिऊन घेते ती
ओठ-पेला
अस्पर्शी;
एक आर्त, गूढ तान...
अंधारतळी खंदकात.



| २१ एप्रिल ८४ |

केवड्याचं एक पातं
स्पर्शण्याचं निमित्त
- नागिणीचा
जहरी
दंश;
अलिप्तता व सावधगिरीचे
सर्व उपाय व दक्षता घेऊनही.
आता
समुद्राचमन करावंच लागणार!



| १२ फेब्रुवारी ८५ |

असा कसा पुन्हा होतो जड भार वेदनांचा
का धूर गर्द होतो राख झाल्या मोहराचा

हलविते आत कुठे चाहूल त्या पावलांची
कबूल होता निरोप मला काफिला सोडण्याचा

झडलेल्या रानवेली अन् बोडके हे वृक्ष सारे
नाही फिर्याद आता-त्रास हा पानगळीचा

पेरलेले शब्द माझे भासती लाव्हाफुले
डोंब हा आतून माझ्या फुफाटतो पाकळ्यांचा

शीळ घाली रानवारा थबकला अचानकसा
चहुकडे घोंगावतो आक्रोश हा वादळाचा



| १५ जानेवारी ८४ |

मी खरंच थांबलो नाही तुझ्यासाठी.
खरंच थांबलो नाही!
तू दिवे मालवलेस.
ठीक केलंस.
पण अंधारलं नाही ग!
चांदणं किती पिठुर पडलंय!
ह्या सतारी कुठे झंकारताहेत?
नि रानभर पसरलेला हा विजनकल्लोळ...



| २१ मार्च ८५ |

रस्ता किती गच्च वाटतोय!
बेभान, बेफाम, अखंड वर्दळ
थेट अगदी क्षितिजतळापर्यंत.

उधळल्या कभिन्नतेत
समुद्र पिऊन मी जवळ आणली
चंद्रनौका...
धूसर रात्रींचे अस्पष्ट पडसाद
ठळक होत जातात
नि प्रशांत निरवतेतून घुमू लागते
एक आर्त संगीत.

ही भैरवी अशी कशी?
आतडी पिळवटून रक्तस्फोट करणारी.
तानसेनाचा निद्रानाश असा का अचानक?

मागे न वळण्याचं ठरवूनही
असं सिंहावलोकन अपरिहार्य
जितकं की
माझ्या श्वासानंतरचा उच्छवास.




| २५ नोव्हेंबर ८२ |

अखेर सगळ्यांनीच निरोप घेतले वळणावर
ठरल्याप्रमाणे; निर्विकार.
मात्र तो-
अनिश्चित वळणाचा मार्गस्थ
शोधात वळणाच्या
गोंधळलेला
एकाकी.
चालू लागतो एका दिशेने
अपरिहार्यपणे...
पुन्हा थबकतो-पुढे असतात अनेक मार्ग
फुटलेले वळणास
छेदून गेलेले एकमेकांस.
सिग्नल पडतो.
थांबतात एका मार्गावरच्या धावणाऱ्या गाड्या.
भजनाचे सूर आळवित, वाद्यांच्या तालात
येतात काही लोक
छेदणाऱ्या दुसऱ्या मार्गावरुन.
तो डोकावतो त्यांच्यात
चौघे वाहून नेत असतात
तिरडीवरुन प्रेत.
काहीसा थरारतो,
पण लगेच पुलकित होतोः
एकतरी वळण आहेच
आयुष्यात आपल्या
अपरिहार्य
पण बिनतक्रार
न गोंधळवणारं.
सिग्नल मिळतो
गाड्या रोंरावत सुटतात
ठरल्याप्रमाणे; निर्विकार.



| १७ नोव्हेंबर ८२ |

मध्यरात्रः
सगळं जग विसावलेलं
अंधाराची रजई पांघरुन.
भोवतालचे माडः स्तब्ध, खडे
रक्षणार्थ वास्तूच्या
वास्तूः समाधिस्थ
का बरे अशावेळी हा समुद्र
गरजत येतोय आमच्याकडे?
...माझ्या मनाचे दृश्य प्रतीक तर नव्हे हे?

****

शेकोटी
भडकणाऱ्या ज्वाळा
बेभान संगीत
नाचतोय समूह फेर धरुन
धुंद.
अवकाश
चमचमत्या तारका
कभिन्न काळोख
नाचतोय त्यांसवे मीही धुंद.
समूहाच्या नकळत.

****

पहाटे गवाक्षातून पाहिलं तर -
खुणावतेय एक चंद्रकोर आकाशी
साठवितोय मीही डोळ्यांत ती
पण...पण क्षणोक्षणी ती निष्प्रभ का होतेय?
...अरे हो! आता तर अरुणोदय होतोय

****

किंग हॉटेल, बोर्डी.
हॉटेलचा हॉल.
हॉलचे प्रवेशद्वार.
प्रवेशद्वारावरील चित्र
सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री
कधीही पहावे, तीच तुझी पुकारणारी नजर
उघडलेले पुस्तक वक्षाशी घट्ट.
तळाशी एकच वाक्य- 'अबाईड वुईथ मी'
...मी तयार होतो ग! पुस्तकाचं रहस्य कळलं नसतं तरी
पण...पण...



| २८ ऑगस्ट ८१ |

फुलांचा प्रदेश मी नाकारला आहे.
का? का? का?
कातरसमयी झमगत्या बागेत फिरताना
सलत असतो हाच प्रश्न

प्रश्नातून निघतात उपप्रश्न;
होतो प्रश्नांचा आवर्त!
त्यात उठतो स्मृतींचा घनावर्त!!
बनतो मग चक्रावर्त!!!

मी, फूल, बाग
घोंगावत असतात सभोवार
असंबद्ध चक्राकार
कुणाचा कुणाला मेळ नाही!

सर्व संपल्यावर मी उठतो राखेतून
टिपतो सांध्यरंग निर्विकारपणे
उद्याची जाणीव असूनही
समजचो स्वतःला
मी अद्भूत फिनिक्स आहे!



| ३० नोव्हेंबर ८२ |

मैफिल असते तेव्हा -
मी विसरलेला असतो
स्वतःला
आयुष्याचे बेगुमान वाळवंट
शिवतीर्थ नाही एखाद्या
क्षणाला.
बरसत असतात अखंडपणे
सांध्यरंग, प्रभातीचे विभ्रम
अन् मध्यरात्रीचे टिपूर चांदणे सुद्धा.

मैफिल संपते तेव्हा -
मीच रुतत चाललेला असतो
माझ्यात खोल; तीक्ष्ण शल्यासारखा.
असतात पसरलेल्या समोर
ओक्या बैठका.
ओअॅसिस अलगद उडून गेलेल्या
बेगुमान वाळवंटासारख्या.


 

| १३ डिसेंबर ८२ |

वाह ! सुंदर, सुसंपन्न प्रदेश !
जग गोडवे गातच असतं
पण त्याच्याही खाली
खूप खाली
असतो खदखदणारा लाव्हा
याचं त्याला भानच नसतं.

दरेक वसंतात येतात
गोंडस गुलाबी पाखरं
बागडतात रोमारोमात
तेव्हा प्रदेश विसरलेला असतो
उरातली आग
म्हणतो : जग म्हणतं ते खरं आहे.
वाह ! सुंदर, सुसंपन्न प्रदेश !
जगाने गोडवे गायलाच हवेत.

वसंत संपतो
भरारतात पाखरे सहजतेने
ज्या प्रदेशात
असेल फुललेला वसंत
तिकडे
जुन्या प्रदेशाचा निरोपही न घेता
हा पाखरांचा स्थायीभावच असतो.

खिळखिळा अस्थिपंजर सावरीत
प्रदेश शांतवत असतो शिशिरात
उरात उसळलेला डोंब
स्वतःलाच समजावतो :
पुन्हा वसंत येईल
पुन्हा पाखरं गातील
जगही गोडवे गाईल
वाह ! सुंदर, सुसंपन्न प्रदेश !

मात्र ह्या वसंतात
अकालीच उफाळलाय
प्रदेशाच्या उरातील डोंब
म्हणू लागलाय प्रदेशही :
बस्स झाले आता पाखरांचे क्षणिक बागडणे
अन् जगाचे कौतुकही !
होऊ दे उद्रेक बेबंदपणे
उरातील ज्वालामुखीचा !!
खाक करु दे सगळ्या
सुंदर, सुसंपन्न संज्ञा !!!
बनू देत उंच, काळे, कभिन्न पहाड
ज्यात राहतील हिंस्र पशू
जे नांदतील सगळ्याच ऋतूंत
नसतील पाखरांसारखे क्षणिक;
नि मग जगालाही म्हणू दे :
बापरे ! किती भयानक न् कीर्रर्र जंगल हे !!!!







| १७ डिसेंबर ८२ |

किनारा : समुद्राचे प्रास्ताविक
मी अन् दोस्त उभे वाळूत
उगवत्या किरणांत न्हात.
किनाऱ्याच्या समुद्रास आहोटी
भरती
माझ्या डोळ्यांतील समुद्रास.
समजावतो दोस्त
जपतो दोस्त
नि शोषतो किनारा
अनाहूत भरती.
मात्र आता
नसतो किनारा फक्त समुद्राचे प्रास्ताविक
असतो किनारा:
माझ्या डोळ्यांतील
अनाहूत भरतीचा
आशय.




























































































































No comments:

Post a Comment